व्यावसायिक, दिलदार मित्र, वादक आणि निसर्गप्रेमी   

संतोष जगदाळे यांची प्रेरणादायी वाटचाल अन् करूण अंत

पुणे : संतोष जगदाळे हे क्रिकेटप्रेमी, निसर्ग वेडे, गायन आणि वादनाची प्रचंड आवड असलेले, उत्तम तबला वादक आणि पेटी विशारद होते. गायनाची मैफल म्हटले की हातातील काम संपवून तातडीने हजर राहणारे... तसेच, दर रविवारी शाळा आणि महाविद्यालयातील मित्रांसोबत टपरीवर गप्पांसोबत चहा ठरलेला. असा आनंददायी प्रवास सुरू असताना पहलगामधील हल्ल्यात कर्वेनगर येथील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले!
 
संतोष जगदाळे पत्नी आणि मुलीसह १९ एप्रिल रोजी पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात जगदाळे यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या. मुलगी सुरक्षित आहे. जगदाळे यांना वादन आणि गायनाची आवड होती. त्यांचे एक बंधू अजय गायक  तर दुसरे अविनाश हे सीए व गिटार वादक. तीनही भाऊ संगीत प्रेमी. संतोष यांच्या मृत्यूने जगदाळे कुंटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घरातील सदस्य निशब्द झाले आहेत. घरात केवळ हंबरडा फुटत असल्याने उपस्थितांचे मन पिळवटून जात होते. या घटनेची माहिती मिळाल्यापासून त्यांच्या घरासमोर मित्र, नातेवाईक, परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
 
जगदाळे यांचा फरसाणचा व्यवसाय असून ते एलआयसीचेही काम करत होते. त्यांचा शिवणे येथे फरसाणचा कारखाना आहे. निसर्ग प्रेमी असल्याने त्यांनी अनेक देशातील पर्यटन केले होते. क्रिकेटपेमी असल्याने ते संधी मिळेल तेव्हा क्रिकेटचा आनंद घेत.  वेळ मिळेल तेव्हा वाद्य वादनाचा सरावही करत होते. दिलदार मित्र म्हणून त्यांची ओळख होती.
 
समूहातील एखाद्या मित्राला कोणत्याही प्रकारची अडचण येवो, जगदाळे हे त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहात होते. अनेक मित्रांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली. ते मित्र समूहात सर्वांचे आधारवड होते. 

सातारा ते कर्वेनगरपर्यंतचा प्रवास 

जगदाळे कुटुंबीय मुळचे सातारा जिल्ह्यातील खडाव तालुक्यातील बुध गावचे. जगदाळे यांच्या वडिलांना दारूगोळा कारखान्यात नोकरी लागल्याने सुमारे ७० वर्षांपूर्वी हे कुंटुंब पुण्यात दाखल झाले. प्रारंभीच्या काळात संतोष जगदाळे यांच्या आई रविवार पेठेत फरसाण विक्रीचा व्यवसाय करत होत्या. नंतरच्या काळात फरसाणचा व्यवसाय खूप वाढला आणि त्यांच्या आई थकल्या. त्यामुळे संतोष यांनी फरसाणचा व्यवसाय पुढे चालविला. एकाच इमारतीत तीन भाऊ वास्तव्याला. तीनही भाऊ आपापल्या व्यवसायात यशस्वी वाटचाल करत असताना संतोष जगदाळे यांच्या मृत्यूने जगदाळे कुंटुब दु:खात बुडाले आहे. 

रविवार आणि टपरीवरचा चहा

संतोष जगदाळे यांनी शाळा व महाविद्यालयीन जीवनापासून मैत्रीधर्म पाळला होता. त्यामुळे दर रविवारी हे सर्व मित्र लोकमान्य नगर परिसरातील एका चहाच्या टपरीवर भेटत असतं.  भरपूर गप्पा, एकमेकांची विचारपूस आणि चहा असे या भेटीचे स्वरूप असे. मागच्या शनिवारी संतोष जगदाळे कुंटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरला गेल्याने रविवारी ते चहाच्या टपरीवर येऊ शकले नव्हते. पुढच्या रविवारी भेट होईल आणि ते काश्मीरच्या आठवणी सांगतील, असे त्यांच्या मित्रांना वाटत होते. मात्र, त्यांच्या निधनाची बातमी आली आणि मित्रांना अश्रू अनावर झाले. 

वैष्णव देवीचे दर्शन राहून गेले 

संतोष जगदाळे यांना वैष्णव देवीचे दर्शन घ्यायचे होते. काश्मीर पर्यटनाच्या नियोजनात वैष्णव देवीचे दर्शन ठरलेले होते. मात्र, काश्मीरमध्ये गेल्यानंतर नियोजनात बदल झाला. पर्यटनानंतर वैष्णव देवीचे दर्शन घेण्याचे ठरले होते. मात्र, वैष्णव देवीचे दर्शन घेण्याआधीच पहलगाव येथे दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला.
 

Related Articles